व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्त्व | Marathi Grammar | The importance of studying grammar

व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्त्व | The importance of studying grammar in marathi

आपले विचार, भावना इतरांना कळावेत म्हणून आपण ते भाषेच्या माध्यमातून सांगतो किंवा लिहून कळवतो.

आपले विचार इतरांना कळले पाहिजेत तसेच इतरांचेही विचार आपल्याला कळले पाहिजेत त्यासाठी आपली भाषा विशिष्ट पद्धतीने बोलली गेली पाहिजे, तशीच लिहिली गेली पाहिजे.

भाषा ठरावीक पद्धतीने बोलली गेली पाहिजे. भाषेचा उपयोग बिनचूक होणे त्यासाठीच आवश्यक आहे.

भाषेचे महत्त्व समजून घेतले की भाषेच्या बिनचूकपणाचे महत्त्वही लक्षात येते. भाषेचे महत्त्व सांगताना ‘मराठी : घटना, रचना, परंपरा’ या ग्रंथात म्हटले आहे “भाषा ही मानवाची निर्मिती आहे. माती निर्मिली देवाने; पण तीतून घडा निर्मिला तो मानवाने.

कापूस ही दैवी सृष्टी; पण कापड ही मानवी सृष्टी होय. शिला ही निसर्गाची करणी; पण मूर्ती ही मानवाची. तद्वतच निसर्गदत्त ध्वनीला स्वरेंद्रियांच्या विविध संयोगांनी व क्रियांनी नियमित आणि वैविध्यमय असे स्वरूप देऊन मानवाने प्रथम वर्णमय रचनासामग्री मांडिली; आणि शतकानुशतकांच्या प्रयत्नांनी तीतून भाषेचे मंदिर उभारिले.

मनातील भाव मुखावाटे प्रकट करण्याचे भाषा हे अत्यंत प्रभावी साधन होय. ते हाती येताच मानवी जीवन इतर प्राणिवर्गाच्या अपेक्षेने कमालीचे सुधारले, पुढारले, परिणत झाले, वैचित्र्याने विनटले, समृद्ध झाले.

भाषा ही मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक बनली. म्हणूनच मनू म्हणतो, ‘वाच्या नियताः सर्वे’ आपल्या जीवनातील सारे व्यवहार भाषेवर अवलंबून आहेत.” (‘मराठी : घटना, रचना, परंपरा’ – अरविंद मंगरूळकर, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर , पृष्ठ ९)

1 व्याकरण व त्याची आवश्यकता

भाषेचा उपयोग करताना जर चुका झाल्या तर त्या आपल्याला खटकतात. उदाहरणार्थ – ‘त्याने ग्रंथ वाचला’, ‘त्याने पुस्तक वाचले’, अशा ठरावीक पद्धतीनेच आपण बोलायला हवे. त्याऐवजी तो पुस्तक वाचला, ‘त्याने ग्रंथ वाचतो’, अशा पद्धतीने जर आपण बोललो तर ते चुकीचे ठरते. भाषेची देवाण-घेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने

चालावा यासाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत. या नियमांनाच व्याकरण असे म्हणतात.

भाषेच्या रचनेचे नियम आपल्या अगदी अंगवळणी पडलेले असतात. भाषा आपण सहजपणे लहानपणापासून बोलायला शिकतो. भाषेच्या रचनेचे नियम लक्षात ठेवून बोलायचे असते हेही आपल्याला जाणवत नाही.

जर कोणी व्याकरणाच्या दृष्टीने बोलण्यात चूक केली तर आपण दुरुस्त करतो. आपण दुरुस्त करतो. याचाच अर्थ आपल्याला नियम माहिती असतात. ‘नियम’ हा शब्द माहिती नसेल तरी आपण अशी दुरुस्ती करतो.

उदा. ‘ती म्हणाली’, ‘मी जातो”. तर आपण दुरुस्ती करून सांगू, ‘ती म्हणाली, “मी जाते.” भाषेची अशी अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजेच भाषेचे व्याकरण होय. .

व्याकरण म्हणजे ‘भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय.’ व्याकरण हा शब्द ‘वि + आ + कृ (= करण)’ यांपासून बनला आहे. याचा शब्दशः अर्थ स्पष्टीकरण’ असा आहे. भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरविले जातात, ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय.’ असे श्रीपाद भागवत यांनी म्हटले आहे.

भाषेचे नियम अंगवळणी पडलेले असतात हे जसे खरे आहे, तितकेच त्या नियमांची माहिती करून घेणे, त्या नियमांनुसार भाषेचा उपयोग करणे हेही आवश्यक आहे.

आपल्याला जे विचार व्यक्त करावयाचे आहेत ते नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास आवश्यक आहे. सामान्यपणे, जेथे नियम, व्याख्या, उदाहरणे, स्पष्टीकरण इत्यादी भाग असतो, तो आपल्याला कंटाळवाणा वाटतो; नकोसा वाटतो. तरीही व्याकरणाचा अभ्यास हा आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या भाषेचा अभ्यास असतो.

आपल्याला दुसरी भाषा शिकवायची असेल तर आपली भाषा म्हणजे मातृभाषा चांगली यावी लागते. आपल्या भाषेचे व्याकरण व आपली भाषा चांगली असली की दुसरी भाषा समजून घेणे सोपे जाते.

आपल्या भाषेवर जसे आपले प्रेम असावे तसेच आपल्या भाषेच्या व्याकरणावरही आपले प्रेम असावे.

व्याकरणाचा अभ्यास म्हणजे ‘लेखी भाषेचा’ किंवा ‘लेखनस्वरूपातील भाषेचा’ व त्या भाषेच्या नियमांचा अभ्यास नाही. तर आपले बोलणे, आपले स्पष्टीकरण कौशल्य, भाषण कौशल्य यासाठीही व्याकरण आपल्याला उपयुक्त ठरते.

उच्चारातील बिनचूकपणा, नेमकेपणा, वाक्यातील शब्दांचा बिनचूक क्रम हे व्याकरणाच्या अभ्यासामुळे आपल्याला येऊ लागतात. म्हणून विद्यार्थिदशेतच नव्हे तर आजीवन ‘व्याकरण’ हा आपल्या अभ्यासाचा, चिंतनाचा विषय होणे आवश्यक आहे.

2. भाषा व व्याकरण परस्परसंबंध

भाषा ही प्रथम माणसांच्या बोलण्यातून, व्यवहारांतून विकसित झाली. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तिचा प्रवास झाला. विपुल शब्द संपत्तीची भर पडत गेली. अनेक वर्षांच्या उपयोगाने तिला एक व्यवस्थित रूप प्राप्त झाले. व्याकरण हे भाषेच्या विकासानंतर साकार होत गेले. .

व्याकरणकारांनी शब्दांची रूपे पाहिली. त्या शब्दांची वाक्यांतील बदलती रूपे पाहिली. शब्दांची वर्गीकरणे केली. अनेक वाक्यांच्या

निरीक्षणातून काही महत्त्वपूर्ण नियम निर्माण केले. भाषेला एक व्यवस्थेचे स्वरूप, नियमांनी युक्त असे स्वरूप व्याकरणकारांनी प्राप्त करून दिले.

नियमांची शास्त्रीयदृष्ट्या सुव्यवस्थित मांडणी केली. भाषा विकसित होत असताना व्याकरण विकसित होते; हे लक्षात घेऊन व्याकरणकारांनी भाषेच्या नियमांची रचना केली. महर्षी पतंजलींनी व्याकरणाला ‘शब्दानुशासन’ असे नाव दिलेले आहे. अनुशासन म्हणजे नियमन, शिस्त.

आपल्या भाषेतील शब्दांतील वर्ण, त्यांचे उच्चार, शब्दसिद्धी, वाक्यरचना, वाक्यातील पदांचेशब्दांचे परस्परसंबंध इत्यादी बाबतीत नियम घालून देणारे शास्त्र म्हणजे व्याकरण, व्याकरण हे भाषेचे रचनास्वरूप आदर्श कसे असावे हे प्रतिपादन करणारे शास्त्र आहे.

भाषा आधी आणि व्याकरण नंतर असा याचा अर्थ नाही. कारण, भाषा ही तिच्या नियमांसह निर्माण होते, विकसित होत असते. त्या नियमांना व्यवस्थेचे स्वरूप व्याकरणाने प्राप्त होते.

व भाषा आणि व्याकरण हे परस्परांपासून वेगळे करता येतच नाहीत. ते ‘परस्परांमध्ये’ व ‘परस्परांवर अवलंबून असणारे’ असतात.

भाषा एखादया नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. भाषेचा प्रवाह अखंड चालू असतो. नदी ज्याप्रमाणे अनेक वळणांनी वाहत असते, त्याप्रमाणे भाषेच्या प्रवाहातही अशी वळणे असतात. भाषेमध्ये बदल होत जातात.

भाषा स्वरूपात बदल होत जाणे हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण असते. भाषा ही स्थलकालानुरूप बदलत जाते. त्यातूनच भाषेच्या विकासाचे टप्पे किंवा प्रदेशानुसार बोलींचे स्वरूप प्रकट होत आहे.

व्याकरणशास्त्र त्यानुसार भाषारूपांचा अभ्यास करते. भाषेच्या या विविध बदलांपुढे व्याकरणाला शरणागती पत्करावी लागते; नियमांना मुरड घालावी लागते. .

आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटके, व्यवस्थित, आकर्षक व बिनचूक असायला हवे. त्यासाठी व्याकरणाचा अभ्यास आवश्यक आहे.

3. व्याकरणाचा अभ्यासविषय

भाषेची घडण समजून घेताना प्रथम लक्षात येते की, भाषा वाक्यांनी बनते, वाक्ये शब्दांनी घडतात आणि शब्द वर्णांनी घडतात.

स्वाभाविकपणे व्याकरणाच्या अभ्यासाचे (१) वर्णविचार,

(२) शब्दविचार व (३) वाक्यविचार असे घटक आहेत.

गल्याप्रमाणे पदय हेही भाषेचे महत्त्वपूर्ण अंग आहे. पक्ष्याच्या संदर्भात

वृत्ते, अलंकार, शब्दशक्ती, कवितेचे रसग्रहण हे घटक महत्त्वपूर्ण ठरतात. त्याही घटकांचा समावेश आपल्या अभ्यासात आहे.

व्याकरणाचा अभ्यास ज्याप्रमाणे महत्त्वाचा असतो तसाच लेखनाचाही! आपण लेखनविभागात कथालेखन, सारांशलेखन, सारग्रहण, निबंधलेखन, संवादलेखन, पत्रलेखन, भाषांतर, मुलाखत आणि म्हणी यांचा अभ्यास करणार आहोत.

या क्रमाने आपण अभ्यास करूया!

स्वयंअध्ययन

(१) व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्त्व स्पष्ट करा.
(२) ‘व्याकरण’ म्हणजे काय?
(३) भाषा व व्याकरण यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा.
(४) ‘व्याकरणकारांची भूमिका’ या विषयावर टिपण तयार करा. (५) ‘भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते.’ या विधानाचे आपल्या भाषेत स्पष्टीकरण करा.

तुम्हाला हे आर्टिकल नक्कीच आवडले असेलच अशी मला खात्री आहे असेच मराठी आर्टिकल वाचण्यासाठी आमच्या >>> maharashtraboardsolutions.org <<<वेबसाईट ला नक्की भेट द्या इथे तुम्हाला सर्व Questions Paper, Digest, maharashtra board solutions, Marathi Books, Maharashtra Board Textbook Solutions आणि आणखी या संबंधी सर्व माहिती मिळेल.

हे पण वाचा :

समानार्थी शब्द

विरुद्धार्थी शब्द

Leave a Comment